शिर्डी, ३ जुलै २०२३: साईबाबांना गुरु मानून असंख्य भाविक शिर्डीत दाखल झाले असून आज पहाटेपासून बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. पिंपळवाडी रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराच्या पुढे पर्यंत ही गर्दी गेली असून शिर्डी भाविकांनी अक्षरशः फुलून गेलीय. शिर्डीच्या साई मंदिरातील मुख्य उत्सवांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा गुरुपौर्णिमा हा उत्सव असतो, या उत्सवाला रविवारी सुरुवात झाली. आज सर्व पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
यामुळे साई मंदिर परिसर गजबजून गेला आहे. भक्तनिवास, साई प्रसादालय आणि शिर्डीचे रस्ते फुल्ल झाले आहेत. मंदिर परिसरात भाविक साईनामाचा सदोदित जयघोष करीत असल्याने, सर्वदूर साईभक्तीचा मळा फुलताना पहावयला मिळाला. प्रशासनाने साई सेवकांना या उत्सवात सेवा करण्याची संधी दिली. बरेचशे सेवक हे दर्शन बारीत सेवा करतांना दिसत होते. मंदिर परिसरात जागोजागी मोफत अन्नदानाचे मंडप दिसत होते.
आज रात्रभर मंदिर उघडे असल्यामुळे काही भाविक हे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघतील. त्यासाठी बस स्थानकांवरुन ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. मात्र कालपासून शिर्डीत दाखल झालेले भाविक पहाटेपासून दर्शनासाठी रांगेत लागले. त्यामुळे साधारणपणे साई कॉम्प्लेक्सच्या पुढे न जाणारी दर्शनबारी ही महालक्ष्मी मंदिराच्याही पुढे गेली. मंदिर प्रशासनाने जागोजागी सुरक्षा रक्षक नेमलेले असल्यामुळे भाविक दर्शन बारीत पुढे जात होते. तरी दोन तास दर्शनासाठी लागत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर











































