माणगाव, रायगड २४ डिसेंबर २०२३ : माणगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २३ डिसेंबर रोजी, १३ लाख रुपयांची स्फोटके जप्त करण्यात आली. या जप्त केलेल्या स्फोटकांच्या बाबतीत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माणगांव पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
स्फोटका बाबतीत मिळालेल्या एका गुप्त माहिती नुसार, माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन माणगाव निजामपुर रोडवर रवाना करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी सकाळी या पथकास पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कंपनीचा पीक अप टेम्पो एमएच १२ एसएफ ४३२२ हे संशयीत वाहन दिसुन आले. त्यानंतर पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदरचे संशयीत वाहन थांबवून वाहनातील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याचे नाव विक्रम गोपाळदास जाट वय २६ वर्षे, पुणे ,असे सांगीतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्यावेळी गाडीमध्ये ९०,८००/- किमतीचे एकुण ४ बॉक्स इलेक्टीक डिटोनेटर, १,७०,०००/- किमतीचे जिलेटीन कांडयांचे ५० बॉक्स आढळले.
त्यानंतर पोलिसांनी सदर मुद्देमाल आणि १०,००,०००/- किमतीचा टेम्पो ताब्यात घेतला आहे. ऐन सुट्टीचा हंगाम आणि नवं वर्षाची चाहूल असताना कोकणात अश्या पद्धतीने स्फोटक सदृश गोष्टी सापडल्याने स्थानिकांमध्ये चिंतेच वातावरण आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव