माणिकराव सातव यांच्याकडून कोविड शासकीय रुग्णालयासाठी वाघोलीत १ एकर जागा दान

9

वाघोली: दि. ०८ ऑक्टोबर २०२० कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात आजही रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे गरीब रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात व पुणे शहराच्या लगतच्या वाघोली परिसरात कोविडचे उपचार व्हावेत यासाठी १ एक एकर जमीन वाघोली ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख जेष्ठ नेते माणिकराव सातव यांनी नुकतीच सरकारला दिली असून या जमिनीवर लवकरात लवकर भव्य शासकीय कोविड-रुग्णालय उभारावे अशी मागणी माणिकराव सातव यांनी केली आहे.

वाघोली येथे कोविड शासकीय रुग्णालयासाठी १ एकर जागा स्व:मालकीची जागा दान केल्याबद्दल वाघोली ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख माणिकराव सातव यांचा वाघोली ग्रामविकास पॅनेल व ग्रामस्थ यांच्या वतीने पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. व हा सन्मान हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख व जि. प. चे सदस्य माऊली कटके, शिवसेना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजयराव सातव, वाघोली ग्रामविकास पॅनेलच्या प्रमुख मीना सातव, यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

याविषयी बोलताना माणिकराव सातव यांनी सांगितले की समाजामध्ये अनेक असे व्यक्ती आहेत की त्यांना पैशाअभावी उपचार करून घेता येत नाही त्यामुळे कित्येकांना आपला या महामारीत जीव गमवावा लागला आहे. आशा सर्वसामान्य नागरिकांना मोफत व अल्प दरात सुसज्ज उपचार मिळावेत वाघोली सारख्या ठिकाणी उपचाराची सोय व्हावी यासाठी माझी एक एकर जमीन रुग्णालय उभारण्यासाठी मोफत देणार आहे. या ठिकाणी शासनाकडून ग्रामस्थांच्या मदतीने सुसज्ज असे मोठे रुग्णालय उभे राहावे आणि वाघोली परिसरातील गरजू व गरिबांची मोफत सेवा होईल ही इच्छा असल्याने मी माझी एक एक्कर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. असाच माणिकराव सातव यांचा आदर्श घेऊन प्रत्येक श्रीमंत व दानशूर व्यक्तींनी पुढं येने व समाज हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.

तर माणिकराव सातव यांच्यासारख्या जेष्ठ व समाजातील सर्व घटकांची जाण असलेल्या दूरदृष्टीचा हुशार कर्तबगार व दानशूर अशा आदर्शवत व्यक्तीला विधान परिषदेवर शरद पवार साहेबांनी काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी यावेळी वाघोली ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिद्र सातव, वाघोलीचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव, भाजपचे संदिप सातव, देवदर्शन समितीचे संस्थापक संपत गाडे, वसंत जाधवराव, भाजपचे अनिल सातव, उद्योजक नटराज सातव, रासपचे जिल्हा कार्यध्यक्ष सागर गोरे, माजी उपसरपंच कविता दळवी, रेश्मा पाचरने, मारुती गाडे, कृष्णकांत सातव, मंगेश सातव, पिंटू कटके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे