मणिपूर विभाजीत नाही तो देशाचा अविभाज्य भाग आहे, स्मृती इराणी यांचे वक्तव्य

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत मणिपूर मुद्यावर आक्रमक भाषण केले. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली,असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी समाचार घेतला. आपल्या भाषाणाच्या सुरुवातीलाच यू आर नॉट इंडिया असे स्मृती इराणी यांनी सुनावले.

अध्यक्ष महोदय आज तुमच्या आसनासमोर ज्या प्रकारचे आक्रमक वर्तन पहायला मिळाले, ते मान्य नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असे बोलले गेले. त्यावेळी काँग्रेस पक्ष या ठिकाणी टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येते, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाही, तो देशाचा अविभाज्य भाग आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

तुमच्या सहकारी पक्षाचा नेता तामिळनाडूत काय म्हणाला? भारताचा अर्थ फक्त उत्तर भारत होतो. राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्ही तुमचा सहकारी डीएमकेचे म्हणणे खोडून दाखवा. काश्मीरला भारतापासून वेगळ केले पाहिजे असे जो काँग्रेस नेता म्हणतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला.

स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी गिरिजा टिक्कू, शीला भट्ट यांच्यासोबत झालेल्या घटनांचा उल्लेख केला. आम्ही काश्मिरी पंडितांवर बोलाव अशी तुमची इच्छा नाही, असे म्हणत स्मृती इराणी यांनी जम्मू-काश्मीर मुद्यावरुन काँग्रेसला घेरले. एकवेळ अशी होती की, काश्मीरमध्ये रक्तपात झालेला, पण राहुल गांधी काश्मीरमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत पोहोचले, तिथे फिरत होते. हे मोदी सरकारने काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे शक्य झाले. काँग्रेस नेते तेथे गेले, त्यावेळी ते अनुच्छेद ३७० लागू करण्याबद्दल बोलले असे स्मृती इराणी म्हणाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा