मनीष पांडे, विजय शंकरची फटकेबाजी, हैदराबादची राजस्थानवर मात

दुबई, २३ ऑक्टोबर २०२०: सुरुवातीच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चरने दिलेल्या दणक्यांमधून सावरत मनिष पांडे आणि विजय शंकर या जोडीने केलेल्या संयमी भागीदारीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून मात केली आहे. राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या १५५ धावांचं आव्हान हैदराबादने २ गड्यांच्या मोबदल्यात १८.१ ओव्हरमध्ये पूर्ण केले. मनीष पांडे आणि विजय शंकरच्या अफलातून खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानचा दणदणीत पराभव केला.

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने जॉनी बेअरस्टोची दांडी गुल केली. वॉर्नर ४ तर बेअरस्टो १० धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर मनिष पांडेने संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला. मैदानावर स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करत मनिषने धावांची गती कायम राहील याची काळजी घेतली. मनीष पांडेने अवघ्या ४७ बॉलमध्ये ८३ धावांची बहारदार खेळी केली. मनीष पांडेने आपल्या खेळीत ८ उत्तुंग षटकार खेचले तर ४ चौकारही लगावले. विजय शंकरने ५१ चेंडूमध्ये ५२ धावा करुन मनीष पांडेला चांगली साथ दिली.

महत्वाची गोष्ट म्हणजे विजय शंकरनेही दुसऱ्या बाजूने मनिष पांडेला उत्तम साथ देत हैदराबादचं आव्हान कायम राखलं. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याला यात अपयश आलं. मनिष पांडेने नाबाद ८३ तर विजय शंकरने नाबाद ५२ धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरचा अपवाद वगळता एकही गोलंदाज यशस्वी होऊ शकले नाहीत.

तत्पूर्वी दुबईच्या स्टेडिअमवर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित २० षटकांमध्ये ०६ गडी बाद १५४ धावा केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर त्यापाठोपाठ बेन स्टोक्स ३०, रियान पराग २०, तर स्मिथ आणि उथप्पाने प्रत्येकी १९ धावा केल्या. राजस्थानकडे बॅटिंग ऑर्डर तगडी असताना देखील मोठी धावसंख्या उभारण्यात राजस्थानला अपयश आलं. राजस्थानचे फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा