‘मन की बात’ ही कोट्यवधी भारतीयांची ‘मन की बात’, पंतप्रधान मोदींचे मत

10

नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज प्रसारित झाला. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात १०० व्या भागाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. भारतीयांप्रमाणेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांचे नागरिक देखील या ऐतिहासिक क्षणात सहभागी झाले.३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमात महिला, तरुण आणि शेतकरी यांसारख्या अनेक सामाजिक गटांना संबोधित केले गेले.सरकारच्या नागरिक-आऊटरीच कार्यक्रमाचा आधारस्तंभ आणि सामुदायिक कृतीला चालना देणाऱ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले.

पंतप्रधान मोदींनी मानले देशवासीयांचे आभार-

आजच्या १०० व्या भागानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय नागरिकांचे आभार मानले.ते म्हणाले,मन की बातचा आज १०० वा भाग आहे. माझ्याकडे हजारो पत्रे, लाखो संदेश आले आहेत. मी त्यातल्या त्यात अधिकाधिक जाण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक प्रसंगी तुमची पत्रे वाचताना मी भावूक झालो, भावनांनी वाहून गेलो. आणि मग स्वतःला सावरले ही. मन की बातच्या १०० व्या भागाबद्दल तुम्ही माझे अभिनंदन केले आहे, परंतु सर्व श्रोते, आमचे देशवासी अभिनंदनास पात्र आहेत. मन की बात ही कोट्यवधी भारतीयांची ‘मन की बात’ आहे आणि त्यांची अभिव्यक्ती आहे.

मन की बात कार्यक्रम हा आपल्या नागरिकांचे रूप आहे; येथे आम्ही सकारात्मकता आणि लोकांचा सहभाग साजरा करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले, हा कार्यक्रम हा इतरांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्याचा एक मार्ग आहे, इतरांकडून शिकण्याचा एक प्रसंग आहे.मोदी म्हणाले की, “३ ऑक्टोबर २०१४ रोजी, विजया दशमी सणाच्या दिवशी, आपण सर्वांनी मिळून ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजया दशमी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. ‘मन की बात’ देखील एक अनोखा उत्सव बनला आहे. जो देशातील लोकांचा चांगुलपणा आणि सकारात्मकता दाखवतो. दर महिन्यात या उत्सवाची देशवासी वाट पाहत असतात.”

भाजपने ठिकठिकाणी आखल्या प्रक्षेपणाच्या योजना-

‘मन की बात’ चा १०० वा भाग एक संस्मरणीय प्रसंग बनवण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात प्रक्षेपणाच्या योजना आखल्या होत्या. देशभरातील राजभवनांमध्ये दूरदर्शनद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात होते.मुंबईतील राजभवनाने महाराष्ट्रातील नागरिकांचे आयोजन केले होते ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी मन की बातच्या मागील आवृत्तीत राज्यातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींसह केला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मोदींच्या ‘मन की बात’चा १०० वा भाग ऐकण्यासाठी न्यू जर्सीमधील भारतीय डायस्पोरामध्ये सामील झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा