मनोज जरांगे पाटीलांची तोफ आज सोलापूरात धडाडणार, आज दुपारी जाहीर सभा

सोलापूर, ५ ऑक्टोबर २०२३ : मराठा आरक्षणाची पेटवलेली ठिणगी महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सोलापूरात जाहीर सभा होणार आहे. यावेळी जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सरकार आणि मंत्रीमंडळाला घाम फोडणारे मराठा योद्धा जरांगे पाटील यांची जाहीर सभा सोलापूरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आज दुपारी होणार आहे.

या सभेसाठी हजारो समाजबांधव एकवटणार असून मराठा आरक्षणाची ही अखेरची लढाई आहे. घरी बसून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी या सभेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सकल मोर्चाचे समन्वयक पवार यांनी केले आहे. जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून हुतात्मा स्मृती मंदिर येथे जाहीर सभा घेणार आहेत.

यावेळी तीनशे भगवे झेंडे आणि दोन मोठ्या एलईडी टीव्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक ते पार्क चौकादरम्यान भगवे झेंडे लावण्यात येणार आहेत. जरांगे पाटील हे धाराशिव येथे जाहीर सभा घेऊन दुपारी दोन वाजता सोलापूरात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत दहा गाड्यांचा ताफा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जीपमध्ये त्यांची मिरवणूक पार्क चौकापर्यंत निघणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा