मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीका केली आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्यांच्या निशाण्यावर होते, मात्र मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर जरांगे यांचा सूर बदलला असून त्यांनी आपल्या टीकेचा मोर्चा थेट शरद पवारांकडे वळवला आहे. “शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलं,” असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधत विचारले की, “सामाजिक कार्यकर्त्यांना महायुतीची स्क्रिप्ट आली आहे का?” त्यांनी पुढे सांगितले, “सध्या महाराष्ट्रात जाती-धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे. महायुती किंवा त्यांना मदत करणारे घटक हे जातीयतेची लढाई चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी जे शरद पवार १९९५ पासून कोणत्याही घटनात्मक पदावर नाहीत, त्यांच्यावरच टीका करण्याची चढाओढ का सुरू आहे?”
जगताप पुढे म्हणाले, “शरद पवारांना कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांनी मागील 68 वर्ष महाराष्ट्रात सामाजिक कार्य उभं केलं आहे. त्यांनी मंडल आयोग लागू करून सर्व समाजघटकांना समान संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे पवारांवर टीका करण्याचा धंदा बंद करून राज्यातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारावेत.”
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, “१९९४ साली शरद पवारांनी आमच्या हक्काचं १६ टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि मराठ्यांचं वाटोळं केलं. आमचं आरक्षण आम्हाला मिळणारच आहे, पण ज्यांनी ते ओबीसींना दिलं, त्या शरद पवारांवर आता प्रश्न विचारला पाहिजे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































