मुंबई, 5 मे 2022: मनसुख हिरेन खून प्रकरणात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला विरोध केलाय. एजन्सीसमोर सर्व कागदपत्रं ठेवण्यात आली असून, मनसुख हिरेनच्या हत्येचा मुख्य सूत्रधार प्रदीप शर्माच असल्याचं ठणकावून सांगितलं जात आहे.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, मनसुख हिरेनने अँटिलिया प्रकरणात स्वत:वरील सर्व आरोप घेण्यास नकार दिला होता, तेव्हा प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींनी मिळून हिरेनच्या हत्येचा कट रचला. सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा या दोघांनाही भीती वाटत होती की हिरेन आपलं रहस्य उघड करेल, त्यामुळं या प्रकरणातील सर्वात कमकुवत दुवा म्हणून त्याची हत्या करण्यात आली.
प्रदीश शर्माने नष्ट केले पुरावे
तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचं काम प्रदीप शर्माकडून सातत्याने होत असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. हा खटला सुरू झाला तेव्हा प्रदीपने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्याच्याकडून प्रत्येक प्रश्नाला खोटी आणि चुकीची उत्तरेही देण्यात आली. प्रदीपसह त्याच्या साथीदारांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोपही करण्यात आलाय.
जामीन अर्ज फेटाळण्यामागं प्रदीप शर्मा हा टोळीचा सक्रीय सदस्य होता, ज्याद्वारे लोकांना दहशत, धमकावले जात होते. याच टोळीने अंबानी कुटुंबालाही धमकी दिली होती. प्रदीप शर्मा निर्दोष नसून तो कट, हत्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचं एनआयए स्पष्टपणे सांगत आहे.
प्रदीप आणि वाजे यांच्या या कटाची माहिती मनसुख हिरेंला आधीच लागली होती, असंही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. मात्र त्यावेळी प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे यांना स्वत:ला वाचवायचं असल्याने त्यांनी हिरेनच्या हत्येचा कट रचला.
पोलीस आयुक्त कार्यालयात गुप्त बैठका
एनआयएने न्यायालयाला सांगितलं की हा एक खूप मोठा कट होता, ज्यामध्ये पार्किंग परिसरात स्फोटकांनी भरलेलं वाहन लावण्यापासून ते जैश-उल-हिंदच्या नावाने धमकीचे संदेश पाठवण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात प्रदीश शर्मासह अन्य आरोपींनी अनेकवेळा बैठका घेतल्याचंही तपास यंत्रणेने उघड केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे