न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर टीका करताना काही चुकीचे संदर्भ वापरले असतील, तर त्याचा प्रतिवाद करता येईल; परंतु राज्यघटनेने आणि भारतीय कायद्याने बहिष्कृत करण्याला आणि मंदिर प्रवेशाला बंदी करता येत नसताना तशी घोषणा शंकराचार्य कशी करू शकतात, हा प्रश्न आहे. शिवाय शंकराचार्यांचे संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे, हे विधान तर देशाच्या घटनेचाही अवमान करणारे आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने वाद ओढवून घेतात. त्यांची काही विधाने चुकीची असतीलही; परंतु त्याचा अर्थ ते जे मुद्दे मांडतात, ते सर्वंच चुकीचे असतात असे नव्हे. त्यांच्या विधानांचा प्रतिवादही करता येईल. लोकसभेत संविधानावर चर्चेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या एका भाष्याचा हवाला देत, राहुल गांधी यांनी भाजप तसेच केंद्र सरकारवर कठोर टीका केली. एकलव्याचा जसा अंगठा कापून घेतला गेला, तसेच देशातील युवकांचे अंगठे कापले जात आहेत, असे सांगून आज देशात ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ अशी लढाई असल्याची टीका त्यांनी केली होती. मी मनुस्मृती मानत नाही. मी संविधानाला मानतो, हे त्यांचे म्हणणे होते. देशात कोट्यवधी हिंदू आहेत, जे संविधानाला मानतात, मनुस्मृतीला नाही. मनुस्मृतीत बलात्काराचे समर्थन आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. त्यावर उत्तर देता आले असते; परंतु शंकराचार्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण मागितले.
राहुल यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे राहुल यांना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. राहुल यांना हिंदू धर्माचे मानण्यात येऊ नये, असे शंकराचार्य म्हणाले. काँग्रेसची यापूर्वी भलामण करणाऱ्या शंकराचार्यांची ही कृती अनेक वादांना निमंत्रण देणारी आहे. मनुस्मृतीचे जसे समर्थक आहेत, तसेच तिच्यावर टीका करणारे अनेक आहेत. महात्मा फुल्यांपासून अनेकांनी मनुस्मृती जाळण्याची भाषा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ती जाळली. त्यानंतरही अनेकदा मनुस्मृतीचे दहन झाले. मनुस्मृतीवरून वाद होत नाही, असे एकही वर्ष जात नाही. भारतात राज्यघटना असतानाही मनुस्मृतीप्रमाणे कारभार चालवण्याचा आग्रह धरणारे ही कमी नाहीत.
मनुस्मृतीला विरोध केला, म्हणून धर्मबहिष्कृत केल्याने राज्यघटनेतील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करायला हवा. मंदिरात प्रवेश नाकारणे हा ही गुन्हा आहे. असे असताना शंकराचार्य अशी चिथावणी देत असतील, तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे धाडस कायद्याचे राज्य म्हणविणारे दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे. ‘ऑल आर इक्वल; बट सम आर मोर इक्वल’ असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय येतो. संभाजी भिडेसह कायदा हातात घेणाऱ्या आणि लिंगभेद करणाऱ्यांना कायद्याचा बडगा उगारण्याचे जसे टाळले जाते, तेच शंकराचार्यांच्या बाबतीतही होण्याची शक्यता आहे. दोन धर्मांत तेढ निर्माण करणारी काही विधाने जशी मौलवींनी केली, तशीच ती हिंदू धर्ममार्तंडांनीही केली आहेत. त्यांच्याबाबतीत कारवाई करण्याचे धाडस दाखवले जात नाही आणि सामान्यांना मात्र कायद्याचा धाक दाखवला जातो.
मनुस्मृतीला विरोध केला, म्हणून राहुल यांना धर्मबहिष्कृत करणाऱ्या शंकराचार्यांना महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर,छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासह अनेकांनी मनुस्मृतीला विरोध केला होता, हे माहीत नसावे. कोट्यवधी लोक मनुस्मृतीला विरोध करतात, त्यांनाही धर्मबहिष्कृत करण्याचे पाऊल शंकराचार्य उचलणार का, हा प्रश्न आहे. मुळात मनुस्मृतीविरोधात दोन टोकाची मते आहेत. त्यातील विचारांचा पुरस्कार करणारा जसा एक वर्ग आहे, तसाच मनुस्मृतीतील विचारांना विरोध करणाराही मोठा वर्ग आहे. अनेकांनी राहुल गांधी हे हिंदूच नाही तर त्यांना बहिष्कृत करण्यात काही अर्थ नसल्याचे शंकराचार्यांना सांगितले होते, तर त्यांना बहिष्कृत का केले, हा प्रश्न उरतो.
एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा नसली, म्हणून लगेच त्या व्यक्तीला बहिष्कृत कसे करता येते, याचे उत्तर मिळत नाही. अनेक लोक देव मानत नाहीत, म्हणून त्यांना धर्मातून काढून टाकण्याचे फर्मान शंकराचार्य काढणार आहेत का, हा जसा प्रश्न आहे, तसाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना तुम्हाला अधिकार कुणी दिला, अशी विचारणारी काही हिंदू धर्मातील मंडळी आहेत, तशीच ती शंकराचार्यांनाही विचारणारी आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. हिंदू धर्मात शंकराचार्यांची अनेक पीठे आहेत. त्यांच्यातही मतभिन्नता असते. हिंदू धर्मियांत अनेक संघटना असतात. मग, अखेरचा निर्णय कुणाचा मानायचा, हा ही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
प्रत्येक हिंदू मनुस्मृतीला एक धार्मिक ग्रंथ म्हणून मानतो, हे शंकराचार्यांचे विधानही अर्धसत्य आहे. कोट्यवधी हिंदू मनुस्मृतीला आपला धर्मग्रंथ मानत नाहीत. त्यातील विचार अर्ध्या मानवजातीवर अन्याय करणारे आहेत, असे अनेकांचे मत आहे. त्यांच्यावर मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. लोकसभेत राहुल गांधी यांनी हाथरस घटनेचा उल्लेख करताना तिथली परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मनुस्मृती आणि राज्यघटनेची तुलना केली होती. ती कदाचित अप्रस्तुत असेलही; परंतु याचा अर्थ धर्म बहिष्कृत आणि मंदिर प्रवेश बंदी तेही लोकशाही व्यवस्थेतील घटनात्मक कायद्यांना धाब्यावर बसवून करावी, असा होत नाही. संविधानात असे कुठे लहिले आहे, की बलात्कार करतात त्यांनी बाहेर फिरावे आणि पीडित कुटुंबाने घरी राहावे. ते तुमच्या पुस्तकात लिहिले आहे, मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे, संविधानात लिहिलेले नाही, असे ते म्हणाले होते.
मनुस्मृतीत अनेक चांगल्या गोष्टी असल्याचे ठराविक वर्ग सांगत असला, तरी त्यात चातुर्वण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. जात उतरंडीचे समर्थन केले आहे. दलित, महिलांना त्यांचे हक्क नाकारून त्यांना दास आणि दासी बनवले आहे. उच्चवर्णीयांना जादा अधिकार देताना अन्य वर्गांना कर्तृत्व दाखवण्याची संधीही नाकारली होती. एकीकडे महिलांची पूजा करण्याचा श्लोक देताना दुसरीकडे महिलांनी कायम कुणाच्या तरी छत्रछायेखाली जगावे असा सल्ला त्यात होता. मनुस्मृतीवर सर्वांत अगोदर महात्मा फुले यांनी प्रहार केला. ‘मनुस्मृती का धिक्कार’ हे पुस्तक महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८५४ रोजी प्रकाशित केले होते; परंतु महाराष्ट्र सरकारने ते महात्मा फुलेंच्या संपूर्ण साहित्यात समाविष्ट करून प्रकाशित केले नाही. नंतर ते झाले हा भाग वेगळा. मनुस्मृतीतील विचार हे समाज दुभंगणारे आहेत. सामाजिक अन्याय करणारे आहेत, तरी ही त्याचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न होतो आणि त्याला विरोधही केला जातो.
दिल्ली विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार त्यावरून वादात सापडले होते. अखेर मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात आले नाहीत. मनुस्मृतीची भलामण करणाऱ्यांची मजल एवढी,की मनुस्मृतीला संविधान, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षा मोठे ठरवले जाते. संभाजी भिडे यांच्यासारख्यांच्या वक्तव्यावर केवळ टीका होते. ‘मनुस्मृतीचे सर्व नियम आणि कायदे पक्षपाती आहेत, ते ब्राह्मण आणि द्विज वर्णांचे हृदय आणि मन उज्ज्वल करण्यासाठी योग्य आहेत आणि उलट मनुस्मृती स्वार्थी आणि दुष्ट हेतूने लिहिली गेली आहे. शूद्र आणि अतिशूद्र हिंदूंचे हृदय आणि मन कमकुवत करून आणि त्यांना कुत्र्यांसारखे प्राणी आणि गुलाम बनवून, अमानवी बनवून. जेव्हा शूद्र आणि अतिशूद्र लोकांना भट ब्राह्मणांचे हे भयंकर षड्यंत्र समजेल, तेव्हा ते खूप रागावतील आणि मनुस्मृतीला मानवी विज्ञान म्हणण्याऐवजी ते त्याला राक्षसांची शिफारस करणारा धर्मग्रंथ म्हणतील.
जर स्वतःला विद्वान म्हणवणाऱ्या ब्राह्मणांनी ही मनुस्मृती नष्ट केली नाही, तर आम्ही हे पुस्तक लहान तुकडे करून शौचालयाच्या कमोडमध्ये टाकू किंवा जाळून टाकू! ब्राह्मणांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा! जर तुम्ही फक्त याबद्दल बोलला नाही, तर मनुस्मृती जाळण्याचे हे काम दिवसाढवळ्या आणि ब्राह्मणांच्या डोळ्यांसमोर केले जाईल, मी भविष्याला सांगतो!’ हे महात्मा फुले यांचे म्हणणे त्यांचेच शिष्य डॉ. आंबेडकर यांनी प्रत्यक्षात आणले. हिंदू धर्मातील जातीभेदाला कंटाळून बाबासाहेबांनी धर्मांतर केले, तरीही अजूनही मनुस्मृतीची भलामण करणाऱ्यांच्या ते लक्षात येत नाही. त्यात हिंदू धर्माचेच नुकसान आहे. हिंदू धर्म व्यापक, सर्वसमावेशक आहे, असे म्हणायचे आणि या धर्मातील निम्म्याहून अधिक वर्गाला समानतेचे अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीचा पुरस्कार करायचा, हे परस्परविसंगत आहे.