राज्यातील अनेक धरणे भरली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला….

यवतमाळ, १५ सप्टेंबर २०२०: विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेलं ईसापुर धरण ९६ टक्के भरलं असून धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी काठावरील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. असा इशारा ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्षाने दिला आहे.

याच बरोबर नाशिक जिल्ह्यातल्या चोवीस धरणांमध्ये सध्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणी चिंता मिटली आहे. गोदावरी आणि दारणा खोऱ्यातून नांदूर मध्यमेश्वर मार्गे मराठवाड्यासाठी २५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यात काल ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याच्या बातम्या आहेत. नांदेड शहरात संध्याकाळी सहाच्या सुमारास दिड तास वादळी वाऱ्यासह ढग फुटी झाली. शहरातील सखल भागात पाणी साचलं असून अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. अर्धापूर शहरातही चांगला पाऊस झाला आहे. नर्सी नायगाव परिसरात मोठा पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे ऊस, कापुस, सोयाबीन, केळी, हळद या पिकांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान विष्णूपूरी प्रकल्पातून २३ हजार ८०१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी आणि पैनगंगा नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा ईशारा यापुर्वीच जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा