६ ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा

सोलापूर, १ ऑक्टोंबर २०२०: येत्या काळात मराठा आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसतायत. कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला की, मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन करू.

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला सध्यातरी स्थगिती दिलीय. त्यामुळं यावर्षी तरी विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे यामुळं मराठा तरुणांचं मोठं नुकसान झालंय. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून मराठी क्रांती मोर्चा पुन्हा एकदा सक्रिय झालाय. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा आलेला दिसला नाही. यामुळं तरुणांमध्ये संभ्रमात आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय.

या सर्व प्रकारामुळं मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, ६ ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिलाय.

यावेळी पाटील यांनी एमपीएससीची परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढं ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचं परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा