आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक 

कोल्हापूर, २३ सप्टेंबर २०२०: सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यांनतर मराठा समाजात राज्य सरकारबद्दलचा आक्रोश वाढत आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज हा आता पुन्हा एकदा आक्रमक झाला असून संघर्षासाठी तयार आहे. मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. 

९ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ मात्र, मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईलअशा इशारा कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला आहे. कोल्हापुरात मराठा गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकूण १५ ठराव करण्यात आले. त्याचप्रमाणे सरकारने ठरावांची अमलबजावणी केली नाही तर १० तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

मराठा गोलमेज परिषदेतले १५ ठराव

१. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच 
२. मराठा समाजाच्या मुलामुलींना शासनाकडून चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा मिळावा
३. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा
४. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी
५. सारथी संस्थेसाठी १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी
६. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी
७. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी
८. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत
९. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी
१०. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे
११. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी
१२. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे
१३. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी
१४. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी
१५. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी  

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा