छत्रपती संभाजी नगर, २४ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवाची बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर केली होती. जोपर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत २४ तारखेपासून प्रत्येक खेडेगावात, प्रत्येक शहरात रोज रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा वेळ देखील ठरवण्यात आला होता. परंतु काल मनोज जरांगे पाटील यांनी त्याच्यामध्ये बदल केला. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत, तसेच लग्नसराई चालू आहे. त्यात काही अडचण नको त्यामुळे रास्ता रोको ऐवजी प्रत्येक गावात ग्रामपंचायत व मंदिर या ठिकाणी रोज धरणे आंदोलन करण्यात येतील अशा सूचना दिल्या आहेत.
मात्र ११ ते १ या दरम्यान रस्ता रोको आंदोलन करण्यात येतील हे ठरले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजेपासून हर्सूल टी पॉइंट या ठिकाणी मराठा समाजातर्फे रस्ता रोको करण्यात आला. मराठा बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जोपर्यंत कायद्याच्या कसोटीत व ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच चालू ठेवू असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
मनोज जरांगे पाटील आम्हाला जसे आदेश देतील तसे पुढील धरणे आंदोलन करणार आहोत. सरकारने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. ते दहा टक्के आरक्षण दिले ते कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणार नाही आणि असे फसवे आरक्षण देऊन आमची दिशाभूल केली आहे. परंतु मराठा समाज या दहा टक्केतून नाहीतर ओबीसीमधून आणि कायद्यात टिकणारे आरक्षण आम्हाला दिले गेले पाहिजे. अशा रोकठोक प्रतिक्रिया मराठा बांधवांनी प्रसार माध्यमांना बोलताना व्यक्त केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर