मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही: उद्धव ठाकरे

मुंबई, १३ सप्टेंबर २०२०: सध्या राज्याचं राजकारण चांगलंच ढवळलेलं आहे. कंगना, सुशांत, रिया यांच्याभोवती सध्या राजकीय वातावरण फिरताना दिसत आहे. तर दुसरीकडं विरोधी पक्ष देखील हाच मुद्दा उचलून धरून राज्य सरकारवर टीका करताना दिसतायेत. दुसरीकडं राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढताना दिसतोय. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक माध्यमांच्या द्वारे जनतेशी संपर्क साधला.

कोरोनाबाबत सांगताना ते म्हणाले, “गेले काही महिने आपण करोनाचा सामना करतो आहोत. हे वर्षच करोना काळात गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी सुरुवातीला सर्व धर्मीयांचे आभार मानतो. सणासुदीचे दिवस असूनही सगळ्या धर्मातील लोकांनी संयम पाळून आपण सगळ्यांनी करोना काळात सहकार्य केलं त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. आयुष्याची गाडी आपण मार्गावर आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. करोनाचं संकट वाढता वाढता वाढे अशी या करोनाची परिस्थिती आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“दोन दिवसांचं आपलं अधिवेशन पार पडलं आहे. या दोन दिवसात सर्वपक्षीयांनी चांगलं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत मास्क लावताना शिथीलता आलेली दिसते आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मला वाटतं की इतर देशांमध्ये लॉकडाउन संपवला आहे पण कायदे कडक केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही तर दंड ठेवला जातोय. गर्दी झाली की दुकान बंद केलं जातं असे कायदे करायची गरज लागायला नको” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“आयुष्यात हे संकट हे कदाचित जगावरचं पहिलं महाभयंकर संकट आहे त्याचा सामना आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. आता मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही

मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातो आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. अनेक लोकांना वाटतंय मिशन बिगिन अगेनमध्ये पुन्हा एकदा राजकारण केलं जातं आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्या मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही

“मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना-भाजपचं सरकार सत्तेत होतं, तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होते. मात्र, विधीमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी बहुमतानं नाही, तर एकमतानं निर्णय घेतला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं, ते आव्हान आपण जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहेत. पण, पहिल्या सरकारचे वकील आपण बदललेले नाहीत, उलट नवे वकीलही नियुक्त केले, ज्या-ज्या सूचना मिळत गेल्या त्यांचं पालन केलं. राज्य सरकार म्हणून आपण कोर्टात कमी पडलो नाही” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“मोठ्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं मानली, पण ते करताना अनाकलनीय पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात तशी दिल्याचे माझ्या माहितीत नाही, पण गरज नव्हती ती स्थगिती दिली.” असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता कोणासमोर काय आणि कशा पद्धतीने गाऱ्हाणं मांडायचे याचा आम्ही अभ्यास करत आहोत, विरोधीपक्ष नेत्यांशी मी फोनवर बोललो, ते सध्या बिहारला आहेत, पण त्यांनीही आपण सोबत असल्याची हमी दिली. इथे राजकारण हा मुद्दा नाही. त्यामुळे मराठा बांधवांनो, तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. आंदोलन जरुर करा, पण केव्हा? सरकार दाद देत नसेल तर आंदोलन करा, विनाकारण उद्रेक कशासाठी करता? आपण एकत्र आहोत” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा