मराठा आरक्षण स्थगितीच्या निषेधार्थ कुटुंबासमवेत काळा दिवस पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

हडपसर, दि. १४ सप्टेंबर २०२०ः महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चा ठरल्याप्रमाणे हडपसर विभागाची मराठा आरक्षण स्थगितीबाबत बैठक कोरोनाचे सावट असल्याकारणाने झूम वेब द्वारे संपन्न झाली. यामध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश टेळेपाटील यांनी मराठा आरक्षण स्थगितीबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण स्थगितीबाबत पुढील दिशा आणि आंदोलनाबाबतीत चर्चा करण्यात आली.

उपस्थित असणाऱ्या मराठा समन्वयकांमध्ये राजेंद्र कुंजीर, संदीप लहानेपाटील, हनुमंतराव मोटे, दिलीपराव गायकवाड, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष रघुवीर तुपे, शिवप्रहार संघटना जिल्हाध्यक्ष कैलास आवारी, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा लगड, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा जयश्रीताई गटकूळ, आदि समन्वयकांनी सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली.

यामध्ये प्रमुख्याने तीन निर्णय प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यात आले. बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी हडपसर भागातील सकल मराठा समाजाच्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या स्वतः च्या घराच्या समोर काळा झेंडा लावून आणि दंडाला काळी फीत बांधून मराठा आरक्षण संदर्भात जो स्थगिती निर्णय झाला त्याचा निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार १७ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यापूर्वी हडपसर विधानसभा आमदार आणि शिरूर लोकसभा खासदार यांच्या घर आणि कार्यालयासमोर घंटानाद करून निवेदन देण्यात येणार आहे. तरी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियम व अटीचे पालन करून निषेध व आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चाने सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा