पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मराठा बांधवांनी पुणे- पंढरपूर महामार्ग रोखला

पुणे ३ नोव्हेंबर २०२३ : नीरा (ता.पुरंदर ) येथे मराठा बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे- पंढरपूर महामार्ग मराठा बांधवांनी अडवून धरला. नीरा आणि परिसरातील मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी इतर समाजातील बांधवांनी देखील मराठा बांधवांना पाठिंबा दिला. तर आज दिवसभर नीरा आणि परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

गुरुवारी सकाळी १० वाजता नीरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात इतर जाती धर्मातील लोक देखील सहभागी झाले होते. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तो पर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला. तर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपत नाही, तो पर्यंत दिवाळी साजरी करायची नाही असा ठरावही मांडण्यात आला.

राज्याच्या सत्तेवर मराठा समाजातील नेते असले तरी त्यांनी मराठा समाजा ऐवजी इतर समाजाचा विचार केला. पण आता त्यांना त्यांच्या समाजाबद्दल काम करण्याची गरज आहे. मराठा समाजातील नेते राज्य कारभार करतात म्हणजे संपूर्ण समाज राज्य कारभार करीत नाही. या समाजातील अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांना आता आरक्षणाची गरज आहे. असा विचार मराठा समाजातील लोकांनी मांडला. केंद्र सरकार आपलं ऐकत नसलं तर सर्व आमदारांनी राजीनामा द्यावा, म्हणजे केंद्र सरकार जागे होईल.

आरक्षणाच्या बाबतीत राज्यशासन वेळकाढूपणा करते आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांनी जर ठोस माहिती दिली असती, चर्चा केली तर जरांगे पाटील त्यांना वेळ देतील. पण शासनाच्या मनात काही तरी काळं- बेर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मनात सरकार बद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. ५८ मोर्चे होऊनही सरकारनं काही केलं नाही, याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेलं रस्ता रोको आंदोलन दुपारी बारा वाजता मागे घेण्यात आले. यानंतर पुणे पंढरपूर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

यावेळी नायब तहसिलदार महादेव जाधव यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवासरे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा