उस्मानाबाद : ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून उस्मानाबाद येथे फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. मात्र हे साहित्य संमेलन अध्यक्ष निवड तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या वादामुळे चर्चेत असतनाच संमेलनात पायरेटेड पुस्तके आढळल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे.
साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हिंगलासपूरकर नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले असता, कचोरीच्या स्टॉलच्या बाजूला पायरेटेड पुस्तकांची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी हिंगलासपूरकर म्हणाले, अजून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झालेले नाही. त्याआधीच कचोरी आणि वडा पावच्या स्टॉलच्या बाजूला ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि ‘कोल्हाट्याचे पोर’ ही पायरेटेड पुस्तके आढळून आली.
याबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके येथे उपलब्ध होती. ‘कोल्हाट्याचे पोर’ची छापील किंमत १२५रुपये आहे. मात्र, पायरेटेड पुस्तक १५० रुपयांना विकले जात होते. ‘आमचा बाप आणि आम्ही’ ही छापील किंमत १५० रुपये असून, पायरेटेड पुस्तकावर २५० रुपये किंमत टाकण्यात आली आहे.’
संमेलनातच असे प्रकार होणे पूर्ण चुकीचे आहे. आम्ही प्रकाशक संमेलनात आधीच पुस्तकांवर सवलत जाहीर करत असतो. गैरव्यवहार करणारे विक्रेते जास्त किंमत लावून वाचकांची फसवणूक करत आहेत. पायरसी हा गुन्हा आहे. सरकारने कडक कायदा करून बंदी आणावी. कारण, अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे घातक आहे. आम्ही संयोजकांकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, ही पुस्तके मी रद्दीतून विकत घेतली, असे विक्रेत्याने सांगितले. मात्र, अशी नवीकोरी पुस्तके रद्दीत कशी विकली जातील, असा सवालही हिंगलासपूरकर यांनी उपस्थित केला. संयोजकांकडे तक्रार केल्यानंतर पुस्तके जप्त करून संबंधित विक्रेत्यास बाहेर काढण्यात आले.