नवी दिल्ली,६ डिसेंबर २०२२: ‘संगम’ या भारतीय नौदलाचे मार्कोस आणि यू एस नेव्ही सील यांच्यातील संयुक्त नौदल विशेष दलांचा ७ वा सराव ०१ डिसेंबर २०२२ पासून गोव्यात सुरू झाला. ‘संगम’ सर्वप्रथम १९९४ मध्ये आयोजित करण्यात आला होता. हा सैन्य सराव दोन राष्ट्रांमधील एक लष्करी आणि मुत्सदेगिरीचा महत्वाचा उपक्रम असून तो दोन्ही राष्ट्रांमधील विश्वास आणि मैत्रीचे प्रतिबिंब आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या आवृत्तीमध्ये सॅन दिएगो, यूएस येथील सील टीम फाइव्हचे कर्मचारी आणि INS अभिमन्यूचे भारतीय नौदल मार्कोस एकत्र येऊन सागरी विशेष ऑपरेशन्सच्या विविध पैलूंवर कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.
यू एस नेव्ही सील, मार्कोस आणि इतर सहभागी राष्ट्रांच्या नौदल विशेष दल संयुक्त सराव दरवर्षी ‘मालाबार’ चा एक भाग म्हणून आयोजित केला जातो. मात्र, सराव मालिका ‘संगम’ ही केवळ अमेरिका आणि भारतीय विशेष दलांमधील द्विपक्षीय सराव आहे. हा सराव तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी नियोजित असून या दरम्यान दलाचे जवान मेरीटाईम इंटरडिक्शन मिशन, डायरेक्ट ॲक्शन मिशन्स, कॉम्बॅट फ्री फॉल जंप्स, स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स आणि इतर विविध प्रकारांमध्ये कौशल्य पारंगत करतील.
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्ये भारत-अमेरिका संयुक्त प्रशिक्षण सराव ‘युद्ध अभ्यास २२’ ची १८ वी आवृत्ती देखील सुरू झाली आहे. तर सरावाची मागील आवृत्ती ऑक्टोबर २०२१ मध्ये जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ रिचर्डसन, अलास्को (यूएसए) येथे आयोजित करण्यात आली होती. ११ व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या द्वितीय ब्रिगेडचे यूएस आर्मीचे सैनिक आणि ASSAM फेगंटमधील भारतीय सैन्याच्या सैनिकांनी या सरावात भाग घेतला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे