सोलापूर, दि.२१ मे २०२० : सोलापुर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच सोलापूर शहरातील मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व रिसर्च सेंटरचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आता हे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आता या रुग्णालयाचा ताबा सोलापूर महापालिकेकडे देण्यात आला आहे. या हॉस्पिटलमधील २०० बेड हे कोव्हिडसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या रुग्णालयांमध्ये कोव्हिड हॉस्पिटल संबंधित पर्याप्त व्यवस्था करावी. या संदर्भाने संपूर्ण नियम पाळले जातील याविषयी रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारीऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी.
या संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या रुग्णालयात वेळोवेळी भेट देऊन सर्व कार्यपद्धतीचे पालन होत आहे की नाही याची खातरजमा करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
रुग्णालयाचे नियोजन व समन्वय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाशी ठेवावा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, राज्य कामगार विमा हॉस्पिटल यासह सोलापुरातील अनेक महत्त्वाची हॉस्पिटल्स् कोविडसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर