नागपूर, २७ फेब्रुवरी २०२१: राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. अलीकडच्या काही दिवसात संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यानंतर प्रशासनाने देखील राज्यातील अनेक ठिकाणी निर्बंध देखील लादले आहे. तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे लॉक डाऊन देखील लादण्यात आले आहे. आता नागपुरात देखील कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळेच नागपुरात दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत.
दरम्यान या दोन दिवसात मद्य विक्रीची दुकाने देखील बंद राहणार आहे. त्यामुळे आपली होणारी गैरसोय पाहता तळीरामांनी नागपुरातील ठीक ठिकाणांवरील मद्य विक्री दुकानांसमोर मोठ्या रांगा लावलेल्या पाहण्यास मिळाल्या. महत्वाचे म्हणजे ही दुकाने शनिवार आणि रविवार या दोन महत्त्वाच्या दिवशीच बंद असणार आहे त्यामुळे लोकांनी आधीपासूनच आपली सोय करून ठेवण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र तळीरामां कडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवताना दिसला.
तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचे संकट पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१८४ वर पोहोचली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे