ग्रामसेविकेचा प्रचंड भ्रष्टाचार अल्पवयीन मुलाच्या नावे काढले बील, नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील प्रकरण

नांदगाव, नाशिक ४ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील ग्रामसेविकेच्या विरोधात सरपंच वैशाली पवार यांनी तान्ह्या बाळासह नांदगाव पंचायत समितीच्या गेट जवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशीही कुठलाच तोडगा निघाला नाही. ग्रामसेविका गौरी आहेर यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून अल्पवयीन मुलाच्या नावे पाईपलाईन दुरुस्तीसाठीचे बील काढले आहे. असे अनेक गैरव्यवहार करत ग्रामसेविका गौरी आहेर यांनी सरकारला लाखों रुपयांचा चुना लावला असुन यंत्रणेला या प्रकरणात जाग का येत नाही? असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

ज्या ग्रामसेविके विरोधात उपोषण सुरु आहे, त्यांच्याकडे मंगळणे येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांनी मंगळणे येथील शरद विजय आहेर या १५ वर्षांच्या मुलाच्या नावे पाईपलाईन दुरुस्तीसाठी ४३०० रुपये बील काढले. कॉन्ट्रॅक्टर सागर मोतीराम आहेर यांच्या नावे अर्धवट राहिलेल्या भुमीगत गटार कामाचे १ लाख २८ हजार ७८० रुपये काढण्यात आलेले आहे. कॉन्ट्रॅक्टर सागर मोतीराम आहेर यांच्याच नावे पाणीपुरवठा आणि विजपंप अर्धवट राहिलेल्या कामाचे १ लाख ८७ हजार ९९० रु. काढले. ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक मुतारी हि सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर पाडण्यात आली. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत उपोषणकर्त्यांनी ग्रामसेविका गौरी आहेर यांनी विविध कामात केलेल्या भ्रष्टाचाराचा फलक तहसील कार्यालयाच्या गेट जवळ लावला आहे.

ग्रामसेविका गौरी आहेर ह्या मुख्यालयी राहत नाही तसेच त्यांनी १५ व्या वित्त आयोगाचे पैसे परस्पर खर्च केले आहेत. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा