माळशिरस, सोलापूर २३ नोव्हेंबर २०२३ : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते, लोणंद, फडतरी, मोरोची, तरंगफळ येथील राखीव वनक्षेत्रांमध्ये काही वनाधिकाऱ्यांनी संगनमत करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमीत जागेवर जेसीबीच्या साहाय्याने जमीन खोदून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. हे अतिक्रमण त्वरित काढून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आज पुणे येथे मुख्यवनसंरक्षक यांना श्री बाबासाहेब रामचंद्र शेंडगे यांनी निवेदन दिले.
मौजे तरंगफळ येथील गट क्रमांक ६९ मधील सुमारे ४२ हेक्टर जमिनीवर बेकायदेशीर रित्या ताबा घेऊन तेथे शेती केली जात आहे. कागदपत्रे आणि सातबाऱ्यानुसार हि जमीन वनविभागाची असून तसा अहवाल तहसिलदार आणि मंडळ अधिकारी माळशिरस यांनी फेरफार क्र. ११४४ ने नोंदविण्यात आला आहे. असे स्पष्ट असताना अतिक्रमण का हटवले जात नाही, जमिनीचा ताबा का घेतला जात नाही असा सवाल बाबासाहेब रामचंद्र शेंडगे यांनी मा.मुख्यवनसंरक्षकांना विचारला आहे.
या संपूर्ण गैरप्रकाराबाबत या आधीही श्री बाबासाहेब शेंडगे आणि ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली, निवेदने दिली आहेत. तरीही अद्याप कारवाई न झाल्याने आज परत एकदा मा. मुख्यवनसंरक्षक प्रादेशीक विभाग यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी बाबासाहेब शेंडगे यांनी अतिक्रमण काढून टाकावे तसेच ते करणाऱ्या व्यक्ती, त्यांना मदत करणारे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात त्वरित कारवाईची मागणी मुख्यवनसंरक्षकांकडे केली. यावेळी माळशिरस परिसरातील ग्रामस्थानीं थाळीनाद आंदोलन केले. कारवाई न झाल्यास नागपुरातील प्रधानमुख्यवनसंरक्षकांच्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बाबासाहेब शेंडगे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर