सोलापूरमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू

सोलापूर, १ जानेवारी २०२३ : नववर्षाचं स्वागत अग्नितांडवानं झालं आहे. नाशिक येथील जिंदाल पॉली फिल्म कंपनीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच पांगरी गावाजवळील (ता. बार्शी, जि. सोलापूर) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनविण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. स्फोट झाला तेव्हा फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करीत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून, फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. स्फोटादरम्यान तीन महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. तिन्ही महिलांचे मृतदेह पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एका रुग्णाची स्थिती अत्यंत नाजूक झाल्याने त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सहा ते सात कर्मचारी गंभीररीत्या होरपळले
स्थानिकांच्या माहितीनुसार सहा ते सात कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन, आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल असून, मृतदेह व जखमींचा शोध घेत असल्याची माहिती पांगरी येथील डॉक्टरांनी दिली.

अग्निशमन दलाला स्थानिकांचे सहकार्य
पांगरी गावाजवळील (ता. बार्शी, जि. सोलापूर) फटाका फॅक्टरीला आग लागली आहे. फटाका फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला स्थानिकांनी देखील सहकार्य केल्याचे दिसून आले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा