ढेंकनाल, ओडिशा १३ जून २०२३: ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडली गावातल्या, टाटा स्टीलच्या हॉट रोल्ड कॉइल प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. कारखान्याच्या भट्टीत हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले तर काही लोक गंभीर आहेत. जखमींना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर टाटा स्टीलनेही एक निवेदन जारी केले आहे. त्यात कंपनीने म्हटले आहे की, तपासणीचे काम सुरू असताना आज दुपारी एक वाजता स्फोटांची घटना घडली. काही लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तात्काळ या प्लांटच्या आवारातील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना कटक येथे हलविण्यात आले. दुर्घटनेच्या वृत्ताने आम्हाला दु:ख झाले असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी आम्ही अंतर्गत तपास सुरू केला आहे, सर्व आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. असे कंपनीकडून सांगण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर