दिल्लीतील भागीरथी पॅलेस इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्य सुरू

दिल्ली, २५ नोव्हेंबर २०२२ : दिल्लीतील चांदनी चौकातील भागीरथी पॅलेस इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नेमकी का लागली ते सध्या तरी समजू शकलेले नाही; पण आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू
शुक्रवारी सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. काल रात्री ९.१९ वाजता अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सुरवातीला अग्निशमन दलाच्या १८ गाड्या पाठविण्यात आल्या. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग एवढी भीषण होती, की तेथे धुराचे लोट दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमुळे आग काही वेळातच पेटली असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात आगीचे लोळ दूरवरून दिसत आहेत.

दरम्यान, घटनास्थळाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. अग्निशमन विभागाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी सांगितले, की आगीमध्ये इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे ४० गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा