अहमदाबादमध्ये इमारतीला भीषण आग, एका मुलीचा मृत्यू

अहमदाबाद, ७ जानेवारी २०२३ : गुजरात मधील अहमदाबादच्या शाहीबाग परिसरात एका इमारतीच्या ७ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला असून अनेक लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अनेक लोक जीव वाचवण्याची आतून मदतीसाठी आरडा ओरडा करताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कुटुंबातील चार जणांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळालेली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. अग्निशमन दलाचे पथक आठव्या मजल्यावर पोहोचले. तिथून दोरी बांधून दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. त्यांनी मुलीला बाहेर काढले, पण तोपर्यंत ती मुलगी शंभर टक्के भाजली होती. तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा