दिवे, १२ ऑगस्ट २०२३ : दिवे आणि परिसरात पावसाने प्रचंड ओढ दिल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. पुरंदर व हवेली तालुक्यांच्या सीमेवर घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला, तर ते पाणी ऐतिहासिक मस्तानी तलावात येते मात्र, या वर्षी पावसाने ओढ दिल्याने मस्तानी तलावात अत्यल्प साठा असून, हा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.
मस्तानी तलाव वडकी गावच्या हद्दीत डोंगरालगत आहे. त्यामुळे हा तलाव भरल्यास वडकी गावातील शेतीला यांचा खूप फायदा होतो. शिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेदखील हा तलाव महत्त्वाचा आहे. अतिशय आखीव-रेखीव असे या तलावाचे बांधकाम आहे. शिवाय येथून पूर्वी अनेक भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, त्यांच्या खुणा आजदेखील येथे दिसतात.
येथूनच पुण्यातील शनिवारवाड्यात एक मार्ग जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटकांनी नेहमीच फुललेला असतो. या वर्षी मात्र आता अगदी ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला, तरीदेखील या तलावात अजिबात पाणीसाठा वाढलेला नाही. सध्या मागच्याच वर्षीचा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा देखील जीव टांगणीला लागला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर