सामना तूर्त स्थगित, मालिका विजयही लांबणीवर

लंडन, ११ सप्टेंबर २०२१: साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल गुरुवारी सकारात्मक आल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. एका पाठोपाठ इतर सदस्य देखील क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर मात्र सर्व टीम चा रिपोर्ट नकारात्मक आला. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने भारतीय क्रिकेट संघाने खेळण्यास नकार दिल्यामुळे शुक्रवारपासून होणारा इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना तूर्त स्थगित करण्यात आला. मात्र मालिकेचा निकाल काय असेल, याबाबतचे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.
कोरोनाचा संघात शिरकाव हा रवी शास्त्री यांच्यापासून झाला. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसरा  विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी मागील आठवड्यात एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्याच ठिकाणी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. शास्त्री हे ५ सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर भरत अरुण, आर श्रीधर आणि नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण आणि श्रीधर हे देखील कोरोनाबाधित आढळले.
भारतीय संघाने चौथा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. भारतीय संघाला २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पाचवा कसोटी सामना बहाल करत यंदाची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द होणार की पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा