मावळच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा मोठा फेरबदल झाला आहे! मावळ पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण घोषित झाल्यामुळे, खुल्या (जनरल) वर्गातील इच्छुकांच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. पाच वर्षांनंतर खुल्या गटासाठी संधी मिळेल, या स्वप्नात असलेल्या अनेक दिग्गज नेते आणि सदस्यांची तयारी एका क्षणात व्यर्थ ठरली आहे. पुन्हा एकदा मावळच्या सत्तेची चावी ओबीसी समाजातील महिलेच्या हाती येणार आहे.
या आरक्षणामुळे मावळच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून, सत्तासमीकरणांची चाचपणी सुरू झाली आहे. गतवेळची भाजपची सत्ता पाहता, आताच्या घोषणेने महायुतीला (भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) पुन्हा एकदा मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी आरक्षणामुळे या गटांमधील इच्छुक उमेदवारांना मोठी संधी मिळू शकते.
मावळ पंचायत समितीत आता सभापतिपदासाठी ओबीसी महिला उमेदवार कोण असणार, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाल्यावर, कोणत्या गणात ओबीसी महिला आरक्षण पडते, यावरच सभापतिपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतील खरी दावेदार स्पष्ट होईल.
या निर्णयामुळे स्थानिक निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. खुल्या वर्गातील इच्छुकांना गमवावी लागलेली ही संधी आणि ओबीसी महिलांसाठी पुन्हा मिळालेला मान, यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीचे चित्र अत्यंत उत्सुकतेचे बनले आहे, यात शंका नाही!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































