वडगाव मावळ, पुणे १५ जुलै २०२३ : मावळ तालुक्यात चारसूत्री व सगुणा राइस तंत्र या आधुनिक पद्धतीसह, आता यंत्राद्वारे भात लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मावळ भागात यांत्रिकीकरणाचा वापर करून भात लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण कमी झाले असून, गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यात पावसाच्या लहरीपणाने लागवडीचा बदलत चाललेला कालावधी दिसून येत आहे.
यामुळे शेतकरी भातशेती करताना पारंपरिक पद्धतीऐवजी, आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन भात लागवड करु लागले आहेत. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, यावर्षी पवन मावळ भागातील कोथुर्णे, येळसे, वारु, काले या गावात यंत्राने मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे नियोजन पवन मावळ कृषी विभागाने केले आहे.
कोथुर्णे येथे प्रगतशील शेतकरी दत्तू नढे यांच्या शेतावर, सहायक कृषी अधिकारी सुनील गायकवाड व विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यात आली. यावर्षीची भात लावणी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंत्राने केल्यामुळे, वेळ ऊर्जा व पैशाची बचत होऊन उत्पादनात वाढ झाली आहे, असे प्रगतशील शेतकरी दत्तू नढे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर