जळगाव मधील धरणगावचा मयुरेश पाटील वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय नौदल अकादमीत अधिकारी म्हणून रूजू

जळगाव ४ डिसेंबर २०२३ : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट येथील रहिवासी असलेल्या मयुरेश दीपक पाटील याने वयाच्या २१ व्या वर्षी राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असून तो आता भारतीय नौदल अकादमीत अधिकारी म्हणून रूजू होणार आहे. मयुरेश पाटील याने राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी खडकवासला पुणे येथून नुकतेच नौदल अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. ३० नोहेंबर रोजी राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनीची १४५ व्या बॅच ची पासिंग आउट परेड झाली. या परेड ची मानवंदना स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू उपस्थित होत्या. तसेच भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण हे देखील या सोहळ्यात उपस्थित होते.

खडकवासला पुणे येथील राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी भारतातील एकमेव संस्था असून जी, तिन्ही सेना दलातील अधिकारी घडविण्याचे काम करते. राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी आशिया खंडातील सर्वात मोठी रक्षा संस्था असून, १४५ बॅच मधून सुमारे ३५३ कॅडेट्स नी आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव मयुरेश पाटील याचा समावेश असून त्याने जिल्ह्याला नौदलात वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळवून दिला.

मयुरेश हा धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट चे माजी सरपंच डॉ. दीपक पाटील व सौ शीतल पाटील यांचा मुलगा असून त्याने १० वी पर्यंतचे शिक्षण जळगाव येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मधून पूर्ण केले. १२ वी पर्यंत चे शिक्षण डिफेन्स करिअर अकॅडेमी छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केले, याच काळात युपीएससी एनडीए २०२० ची परीक्षा उत्तीर्ण केली. डिसेंबर २०२० मध्ये विशाखापट्टण येथे पाच दिवसीय मुलाखात यशस्वी रित्या पास होवून २०२१ मध्ये १४५ व्या बॅच साठी दाखला मिळविला. पुढील एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी तो आता केरळ येथील भारतीय नौदल अकादमी (आयएनए) येथे रुजू होणार आहे. मयुरेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा