पुण्यातील कोथरूड येथील ‘जीत’ मैदानात शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी सुरू असलेला गोंगाटयुक्त गरबा-दांडिया कार्यक्रम खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी थेट हस्तक्षेप करून बंद पाडला. नागरिकांनी मोठ्या आवाजामुळे तक्रार केली होती, मात्र पोलिसांकडून योग्य ती कारवाई झाली नव्हती. नागरिकांच्या तक्रारीनंतर खासदार कुलकर्णी कार्यक्रमस्थळी धाव घेतले आणि ठणकावून सांगितले की, “या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. आवाजाची मर्यादा ओलांडून आणि सण-उत्सवाला गालबोट लागेल, अशा पद्धतीने कार्यक्रम होत आहेत. यापुढे जीत मैदानात असे कार्यक्रम होऊ देणार नाही.”
कुलकर्णी यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवरही गंभीर आरोप केले. त्यांनी स्पष्ट केले की, कोथरूड पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेत कार्यक्रम थांबवला. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आवाजामुळे आरोग्य बिघडल्याची तक्रार केली होती. विद्यार्थी अभ्यासात अडथळा येत होते, तर रुग्णांना रात्री झोप लागत नव्हती. मुलांच्या शालेय परीक्षांच्या काळात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या कार्यक्रमांमुळे पालकही त्रस्त झाले होते.
डीजे मुक्त उत्सव आणि ढोल-ताशांवर निर्बंधाची भूमिका सातत्याने मांडली जात आहे. गणेशोत्सव आणि ईदनंतर आता नवरात्रोत्सवातही ठिकठिकाणी स्पीकरच्या भिंती लावून कार्यक्रम होत आहेत, तसेच ढोलताशांचा दणदणाट सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी खासदार कुलकर्णी यांच्या या कारवाईचे स्वागत केले असून प्रशासनाने यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































