पुणे २१ जून २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असुन त्यांचे अमेरिकेत उत्साहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी या अमेरिका दौऱ्यात अनेक उद्योगपती, स्थानिक नेते अन् उच्च-पदस्थ लोकांशी बैठका करतायत. या अमेरिका दौऱ्यात त्यांनी ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांची भेट घेतली.
मोदींनी मस्क यांच्यासोबतच्या या भेटीचा फोटो शेअर केलाय. ही भेट अतिशय चांगली राहिली. ऊर्जेपासून ते अध्यात्मापर्यंतच्या मुद्द्यांवर आमची दिलखुलास चर्चा झाली, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मोदींनी उद्योगपती रे डलियो यांचीही भेट घेतली आहे. भारतातील गुंतवणुकीला अधिक वाढवण्याच्या मुद्द्यावर आमची चर्चा झाली, असे मोदी यांनी ट्विट केले.
भारतात पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली, लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. बहुदा मोदींचा या कार्यकाळातील अमेरिकेचा हा शेवटचा दौरा असेल. मोदींच्या या दौऱ्यातून भारतासाठी काय फलित मिळते याकडे अनेक देशवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर