शरद पवार आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत भेट

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत दोघांची भेट झाली. पवार यांनी अलीकडंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकीकडं देशभरातील विरोधक केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याची व अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखत असताना पवारांनी भाजपच्या या दोन्ही मोठ्या नेत्यांची भेट घेतली


दरम्यान शरद पवार यांनी अमित शहा यांच्याशी भेटी विषयी माहिती ट्विटर द्वारे सांगितली. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते. मात्र, शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये भेटीचं कारण नमूद केलं असलं, तरी गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी घेतलेल्या राजकीय भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे राजकीय संदर्भ असल्याचे तर्क महाराष्ट्रात काढले जात आहेत.


शरद पवार यांनी दुपारी २ च्या सुमारास संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. म्हणजे शरद पवार आणि अमित शाह या दोघांची वेगळी १५ मिनिटे बैठक झाली. या वेगळ्या बैठकीत ‘वेगळ्या’ विषयावर खलबतं झाल्याचं सांगण्यात येत आहे.


शरद पवारांचं ट्वीट


शरद पवारांनी ट्वीट करून या भेटीविषयी माहिती दिली आहे. “सर्वप्रथम मी अमित शाह यांचं देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली”, असं शरद पवारांनी नमूद केलं आहे.


शरद पवार दिल्लीत कोणाकोणाला भेटले?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

गृह आणि सहकार मंत्री अमित शाह.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा