नवी दिल्ली, २ जून २०२१: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोकसी सध्या डोमिनिकाच्या ताब्यात आहे आणि त्याच्या बाबतीत हे प्रकरण स्थानिक न्यायालयात आहे. चोकसी प्रकरणावर आता पुढील सुनावणी बुधवारी कोर्टाकडे होणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता ती सुरू होईल.
फरार हिरा व्यापारी मेहुल चोकसी प्रकरणी सुनावणी गेल्या आठवड्यात शुक्रवारी डोमिनिकाच्या कोर्टात झाली, त्यानंतर पुढील सुनावणीसाठी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले. तथापि, सुनावणीच्या वेळी तो वैयक्तिकरित्या हजर झाला नाही आणि त्याच्या वकिलांनी प्रतिनिधित्व केले. वकिलांच्या वतीने कोर्टात हाबियास कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली.
आता असा प्रश्न आहे की, मेहुल चोकसी हा भारतीय नागरिक असल्याचे भारत कसे सिद्ध करेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अँटिगाचे नागरिकत्व घेणाऱ्या मेहुल चोकसीने आपले भारतीय नागरिकत्व आत्मसमर्पण करण्यासाठी औपचारिकता व कागदपत्र कधीच पूर्ण केले नाही.
भारतीय अधिकाऱ्यांकडे पुरावा!
त्याने कधीही भारतीय नागरिकत्व सोडण्याचे कागदपत्र पूर्ण केले नसल्यामुळे, अद्यापही तो भारतीय नागरिक असल्याचे नोंदी दाखवतात. भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मेहुल चोकसीचे रेशनकार्ड यासह अनेक कागदपत्रे गोळा केली असून त्यानुसार तो अद्यापही भारताचा नागरिक आहे. ही सर्व कागदपत्रे डोमिनिकन कोर्टासमोर सादर केली जातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे