परभणी,१० जून २०२३ : परभणी जिल्ह्यात २०२१ मध्ये एकूण ५५६ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र बारा महिन्याच्या मुदतीनंतरही सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपल्यावरही जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी आँचल गोयल यांनी जिल्हाभरातील २०० ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे सांगितले आहे. तसेच २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढणाऱ्या दोनशे सदस्यांनी विहित मुदतीत जातीचा दाखला सादर केला नसल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ माजली असून, रिक्त २०० जागावर पोटनिवडणूक होते का हेच पाहने आता महत्त्वाचे असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकी साठी राखीव जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करताना, अनेक इच्छुक उमेदवारांकडे आपले जात प्रमाणपत्र उपलब्ध नसते. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने निवडणूक लढवल्यानंतर,उमेदवार निवडून आल्यावर बारा महिन्याच्या आत मध्ये आपले जात प्रमाणपत्र विहित नमुन्यात सादर करण्यासाठी मुदत ठरवून दिली आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी याकडे सर्रासपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर