पुणे, १८ डिसेंबर २०२२: आज (१८ डिसेंबर) फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत फ्रान्सचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. फ्रान्सनं मोरोक्कोचा तर अर्जेंटिनानं क्रोएशियावर मात करून विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. फ्रान्सचा संघ सध्याचा चॅम्पियन असून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघालाही ३६ वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवून तिसऱ्यांदा चॅम्पियन बनायचं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता दोहा येथील लुसेल स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.
गोल्डन बूटसाठी मेस्सी-एमबाप्पे मध्ये लढत
अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे मेस्सी आणि एमबाप्पे हे फ्रेंच क्लब पीएसजीकडून क्लब फुटबॉल खेळतात पण आता दोघं आमनेसामने असतील. मेस्सी आणि एमबाप्पे यांच्या नावावर सध्या ५-५ गोल आहेत आणि दोघेही गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट मिळतो. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असंल की लिओनेल मेस्सी आणि कायलियन एमबाप्पे यांनी सारखेच गोल केले तर गोल्डन बूट कोणाला मिळणार?
हा आहे गोल्डन बूटचा नियम
जर दोन खेळाडूंनी सर्वाधिक गोल केले असतील, तर कोणत्या खेळाडूनं पेनल्टीच्या मदतीने कमी गोल केले हे पाहिलं जाईल. दोघांनी पेनल्टीवर केलेले गोल समान असल्यास, ज्याने सर्वाधिक असिस्ट केलं असेल त्याला अवॉर्ड मिळेल. दोघांचे असिस्टही समान असल्यास, मैदानावर कमीत कमी वेळ घालवणाऱ्या खेळाडूला हा अवॉर्ड दिला जाईल.
वरील नियम पाहता, मेस्सीनं त्याच्या पाचपैकी तीन गोल पेनल्टी किकद्वारे केल्यामुळं सध्या एमबाप्पेचा वरचा हात आहे. मेस्सीनं सौदी अरेबिया, नेदरलँड, क्रोएशिया आणि तिन्ही संघांविरुद्ध पेनल्टीवर प्रत्येकी एक गोल केला. त्याचबरोबर एमबाप्पेने पाचही गोल आउटफिल्डद्वारे केलेत. एम्बाप्पेनं आपली आघाडी कायम ठेवल्यास गोल्डन बूट जिंकणारा तो पहिला फ्रेंच खेळाडू ठरेल. १९५८ च्या विश्वचषकात जस्ट फॉन्टेनने विक्रमी १३ गोल केले असले तरी गोल्डन बूट पुरस्कार देण्याची प्रथा तेव्हा सुरू झाली नव्हती.
अल्वारेझ-गिरोडही या शर्यतीत
तुम्हाला आठवत असंल की गोल्डन बूट अवॉर्डची सुरुवात १९८२ साली फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत झाली होती. यापूर्वी हा अवॉर्ड गोल्डन शू म्हणून ओळखला जात होता, परंतु २०१० मध्ये तो बदलून गोल्डन बूट करण्यात आला. गोल्डन बूटच्या लढतीत कायलियन एमबाप्पे आणि मेस्सी आघाडीवर असतील, पण फ्रान्सचा ऑलिव्हियर गिरोड आणि अर्जेंटिनाचा ज्युलियन अल्वारेझही या शर्यतीत आहेत. अल्वारेझ आणि गिरोड या दोघांनी ४-४ गोल केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे