पुणे, २३ जुलै २०२३ : महामेट्रोचे पुण्यातील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, मेट्रो या टप्प्याच्या उद्धाटनासाठी आता सज्ज झाली आहे. महामेट्रोने यापूर्वी पहिल्या टप्प्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. कारण पुढच्या महिन्यात १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान शहरातील विकास प्रकल्पांचे उद्धाटन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात शहरातील पंतप्रधान आवास योजना आणि मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्धाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या पहिला टप्पा वनाज ते गरवारे कॉलेज आणि पीसीएमसी ते फुगेवाडी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
त्या कामांचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात झाले. आता पहिल्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो धावत असून, प्रवासीदेखील प्रवास करीत आहेत. आता मेट्रोचा दुसरा टप्पा असलेल्या गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते शिवाजी नगर भुयारी मेट्रो स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर