मुंबईतील पंधरा इमारती अतिधोकादायक असल्याचे म्हाडाकडून जाहीर

75

मुंबई, १ जून २०२३ : मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा पंधरा अतिधोकादायक इमारतींची यादी म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत आहेत. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे आवाहन इमारत दुरूस्ती मंडळाने केले आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या तसेच धोकादायक मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी पंधरा इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे.

आढळुन आलेल्या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नंतर १५५ रहिवाशांनी स्वतःची निवार्‍याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत एकवीस रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच २२२ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असून, मंडळाकडून संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर