पुणे, १७ ऑगस्ट २०२३ : पुणे शहराचे वाढते नागरीकरण आणि फोफावत चाललेला विस्तार, त्याच बरोबर कामधंदयामुळे बाहेरून येऊन स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. तसेच आयटी क्षेत्रातील लोकांचा पुणे शहराकडे कल अधिक आहे. यामुळे पुणे शहरातील घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. मागणी जास्त असल्यामुळे घराचे दर वाढलेले असतात, परंतु आता पुणे शहरात कमी किंमतीत घर घेण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ही संधी मिळणार आहे. म्हाडाकडून पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया कधीपासून सुरु होणार आहे, यासंदर्भातील माहिती मिळाली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नुकतीच ४,०८२ घरांची लॉटरी काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मंडळाची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे म्हटले होते. मुंबईनंतर आता पुण्यात पाच हजार घरांची सोडत निघणार आहे. यासाठी २५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरु होणार आहे.
पुणे म्हाडासाठी विविध गट असणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च असे गट असतील. पुणे शहरासह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी सोडत निघणार आहे, अशी माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. म्हाडाकडून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी किंमतीत घरे मिळतात. यामुळे हजारोजण यासाठी अर्ज करतात. म्हाडाची जाहिरात कधी निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. लॉटरी पद्धतीने ही घरांची सोडत काढली जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर