मी पूर्वीपासून शरद पवारांचा समर्थक: रामदास आठवले

पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, प्रदेश सरचिटणीस राजा सरोदे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत आठवले म्हणाले, ‘मी पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे. नक्षलवाद्यांशी संबंध नसलेल्यांवर कारवाई झाली असल्याचे पवार यांना वाटत असेल, तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. कोरेगाव भीमा प्रकरण आणि एल्गार परिषद याचा काहीही संबंध नाही. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा.’

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत नक्षलवादाशी संबंध नसलेल्यांवर झालेल्या कारवाईप्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांची केली आहे. पवार यांच्या या मागणीला आठवले यांनी पाठिंबा दिला. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत मुस्लिम समाजाला भडकविण्याचे काम कम्युनिस्ट पक्ष आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष करत आहेत,’ असा आरोप आठवले यांनी केला. आठवले म्हणाले, ‘राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी निर्णय झाल्यानंतर मुस्लिम समाजाने शांतता राखली. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे मुस्लिम समाजातील तरुणांना भडकवण्याचे काम करत आहेत; पण मुस्लिम समाजाने शांतता राखावी. हे कायदे देशातील मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत.’

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा