न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे
भारतीय हवाई दलात साठ वर्षांहून अधिक काळ सेवा देणारी मिग-२१ या लढाऊ विमानांची मालिका या वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. अमेरिकेच्या एफ-१६ विमानांना धडकी भरवणाऱ्या आणि पाकिस्तान युद्धापासून ते थेट बालाकोट हल्ल्यापर्यंत यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या या विमानांना नंतर उडत्या शवपेट्या असे म्हटले गेले; परंतु तरीही त्याची भारतीय हवाई दलातील कामगिरी दुर्लक्षिता येणार नाही.
कारगिलपासून बालाकोट हवाई हल्ल्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सोव्हिएत रशियाच्या मिग-२१ विमानाचा इतिहास बराच गुंतागुंतीचा आहे. वेगवेगळ्या संघर्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतरही सतत जुन्या होत असलेल्या हार्डवेअरमुळे या लढाऊ विमानाला एकेकाळी उडत्या शवपेट्या म्हटले जात असे. असे असूनही, परदेशी लढाऊ विमानांची खरेदी न झाल्यामुळे आणि भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान – तेजस एमके-१ च्या निर्मितीला झालेल्या विलंबामुळे भारतीय हवाई दलाने बराच काळ मिग-२१ निवृत्त करण्याचे टाळले. भारताने जेव्हा मिग-२१ खरेदी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकसभेत बराच गोंधळ झाला होता; परंतु विमानासह तंत्रज्ञान हस्तांतरणाचा त्या वेळचा करार किती योग्य होता, हे नंतर सिद्ध झाले. भारताने वेगवेगळ्या प्रकारांची ७०० मिग-२१ विमाने खरेदी केली होती.
यामध्ये टाइप-७७, टाइप-९६, बीआयएस आणि बायसन यांचा समावेश होता. मिग-२१ वेळेप्रमाणे २०२२ पर्यंत निवृत्त होणार होते; पण त्याला पर्याय न मिळाल्याने आताही तेच सेवेत आहे. आता मात्र सप्टेंबरमध्ये ते निवृत्त होणार आहे. २०१७ ते २०२४ दरम्यान मिग-२१ च्या चार स्क्वॉड्रन निवृत्त झाल्या आहेत. आता मिग-२१ ची निवृत्ती जवळ येत असताना, भारतीय हवाई दलाकडे कोणती विमाने आहेत आणि सध्याच्या स्क्वॉड्रनची ताकद किती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत ‘तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एलसीए) बनवण्याची तयारी करत आहे. या प्रकल्पाला १९८३ मध्ये मंजुरी देण्यात आली. बांधकामाची अंतिम मुदत १९९४ मध्ये निश्चित करण्यात आली होती. अनेक निर्बंध आणि पुरवठ्यातील समस्यांमुळे हा प्रकल्प सतत पुढे ढकलला जात आहे. सध्या भारताकडे तेजस मार्क-१ चे फक्त दोन स्क्वॉड्रन सेवेत आहेत. यामध्ये एकूण ३८ जेटस्देखील आहेत.
तथापि, तेजस मार्क-१ मध्ये काही कमतरता आहेत, ज्या तेजसच्या पुढील प्रकार, मार्क-१ए द्वारे दूर करायच्या होत्या. दुसरीकडे, भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. यापैकी सहा विमाने भारतात दाखल झाली आहेत, तर ३० राफेल अद्याप भारतात येणे बाकी आहेत. हे भारताचे दोन स्क्वॉड्रन आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये तेजस एमके-१ए लढाऊ विमान तयार करण्याचे कंत्राट ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला दिले. त्यानंतर मार्च २०२४ पर्यंत भारताला पहिले तेजस एमके-१ए मिळेल असा निर्णय घेण्यात आला; परंतु आता २०२५ च्या मध्यापर्यंतही भारताला तेजस एमके-१ए मिळालेले नाही.
‘एचएएल’च्या मते विलंबाचे मुख्य कारण ‘जनरल इलेक्ट्रिक्स’कडून जीई-४०४ इंजिन मिळण्यास झालेला विलंब आहे. ‘एचएएल’कडे सध्या सहा तेजस एमके-१ए एअरफ्रेम आहेत; परंतु त्यामध्ये इंजिन नसल्याने लढाऊ विमान तयार झालेले नाही. ‘जीई’ने आतापर्यंत फक्त एक इंजिन दिले आहे आणि मार्च २०२६ पर्यंत १२ इंजिन प्रदान करेल असे म्हटले आहे. यामुळे, वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आणि त्यांना सक्रिय सेवेत आणण्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
‘एचएएल’ने यापूर्वी भारतीय हवाई दलाला दरवर्षी १६ लढाऊ विमाने पुरवण्याची वेळ निश्चित केली होती. २०२९ पर्यंत भारताकडे तेजस मार्क-१ए ची ८३ विमाने म्हणजेच चार स्क्वॉड्रन असायला हवीत; परंतु आता विमानांच्या निर्मितीला विलंब झाल्यामुळे ही वेळ आणखी वाढली आहे. ‘एचएएल’ने लढाऊ विमाने वेळेत पुरवण्यासाठी नाशिकसह आणखी तीन केंद्रांवर उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जेणेकरून २०२६ पर्यंत एचएएल दरवर्षी हवाई दलाला ३० लढाऊ विमाने देऊ शकेल. जर हे शक्य झाले तर २०२९ पर्यंत ८३ लढाऊ विमानांची पहिली डिलिव्हरी पूर्ण केली जाऊ शकते. या प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर, ‘एचएएल’ २०३१ पर्यंत ६७ हजार कोटी रुपयांच्या आणखी ९७ एमके-१ए लढाऊ विमानांची डिलिव्हरी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ४५० लढाऊ विमाने आहेत.
त्यांच्या स्क्वॉड्रनची संख्या सुमारे २५ आहे. तथापि, या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानला चीनकडून ४० पाचव्या पिढीतील शेनयांग जे-३५ लढाऊ विमाने मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या स्क्वॉड्रनची संख्या वाढण्याची शक्यता आहेच; परंतु त्यांच्याकडे पाचव्या पिढीतील विमाने असतील. अहवालांनुसार, चीनचे हवाई दल सध्या आशियातील सर्वात बलवान आहे. चीनकडे एकूण ६६ स्क्वॉड्रन आहेत. त्यांच्याकडे सुमारे १२०० लढाऊ विमाने आहेत. यापैकी अनेक पाचव्या पिढीतील जे-२० आहेत. दुसरीकडे, लवकरच जे-३५ लढाऊ विमाने सेवेत आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे चिनी हवाई दलासह लढाऊ विमानांची संख्या झपाट्याने वाढेल. भारत तेजस एमके-१ए द्वारे आपल्या लढाऊ विमानांची आणि स्क्वॉड्रनची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, सध्या भारताकडे पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने नाहीत. त्याला अमेरिकेकडून एफ-३५ आणि रशियाकडून सुखोई-५७ चेकमेटची ऑफर मिळाली आहे.
तथापि, त्यांच्या खरेदीबाबत विचार अजूनही सुरू आहे. दुसरीकडे, भारताचा स्वतःचा पाचव्या पिढीतील लढाऊ विमान -अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) मिळविण्याचा प्रयत्न आहे. ‘एलसीए तेजस’ प्रकल्पात झालेल्या विलंबापासून ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत आता सरकारने या प्रकल्पासाठी खासगी भारतीय कंपन्यांना ‘एचएएल’ सोबत भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे. याद्वारे, परदेशी कंपन्या किंवा स्वदेशी कंपन्या ‘एचएएल’ सोबत भागीदार म्हणून पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने बनवू शकतात.
सहा दशकांहून अधिक काळ सर्व मोठ्या युद्धांमध्ये भारतीय आकाशाचे रक्षण केल्यानंतर, प्रसिद्ध मिग-२१ लढाऊ विमान (मिग २१) सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. भारतीय हवाई दल १९ सप्टेंबर रोजी चंदीगड एअरबेसवर एका औपचारिक समारंभात उर्वरित रशियन-मूळ मिग-२१ ताफ्याला निवृत्त करणार आहे. सध्या मिग-२१ बायसनचे दोन स्क्वॉड्रन सक्रिय आहेत. मिग २१ हे रशियाकडून १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाले. २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सुखोई -३० एमकेआय येईपर्यंत हे रशियन-निर्मित जेट हवाई दलाचा कणा राहिले. भारताला ४२ फायटर स्क्वॉड्रनसाठी मान्यता आहे; परंतु फक्त ३१ सक्रिय स्क्वॉड्रन आहेत. मिग-२१ ताफ्यातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सक्रिय फायटर स्क्वॉड्रनची संख्या आणखी कमी होईल.
चीन आणि पाकिस्तानकडील स्क्वॉड्रनची संख्या लक्षात घेता भारताला हवाई दल आणखी किती मजबूत करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते. बायवसन ही मिग-२१ विमानाची प्रगत आवृत्ती आहे. गेल्या जवळजवळ तीन दशकांत भारतीय हवाई दलाच्या १०० हून अधिक मिग-२१ विमानांना बायसनमध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. मिग-२१ च्या बायसनमध्ये अपग्रेडमध्ये एव्हियोनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स, मल्टी-फंक्शन डिस्प्ले कॉकपिट, कोप्यो लाइट-वेट मल्टी-मोड रडार, रेडिओ सेट, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम/जीपीएस, हेल्मेट-माउंटेड डिस्प्ले आणि सुधारित विंडशील्ड इत्यादींचा समावेश होता. तथापि, अपग्रेड दरम्यान जेटची इंजिन कार्यक्षमता आणि भार वाहून नेण्याची क्षमता सुधारता आली नाही. २२३० किलोमीटर प्रतितास वेग, क्षेपणास्त्रांनी सुसज्ज हे जेट २३ मिमी ट्विन-बॅरल तोफ आणि चार आर-६० क्लोज कॉम्बॅट क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते.
सुरुवातीला इंटरसेप्टर म्हणून विकसित केलेले, सुपरसॉनिक जेट जमिनीवरील हल्ल्यांसह मल्टीरोल फायटर म्हणून काम करण्यासाठी अपग्रेड करण्यात आले. भारताने लढलेल्या सर्व युद्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही, मिग-२१ जेट अनेक अपघातांमुळे चर्चेत राहिले आहे. मिग-२१ ने ज्या पद्धतीने भारत आणि हवाई दलाची सेवा केली आहे ती अतुलनीय आहे. मिग-२१ हे एक लढाऊ विमान म्हणून लक्षात ठेवले जाईल. त्याने दोन शेजारी शत्रूंपासून भारताचे रक्षण केले. आपली ताकद वापरून सीमा सुरक्षित ठेवल्या.












































