गोल पोस्ट महाराष्ट्र दूध दर आंदोलनचा भडका,गोकुळ दुध संघाचा टँकर फोडला हजारो लीटर दूध रस्त्यावर…..

दूध दर आंदोलनचा भडका,गोकुळ दुध संघाचा टँकर फोडला हजारो लीटर दूध रस्त्यावर…..

सांगली, २१ जुलै २०२० : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.तर पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर २५ हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.

स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध विभागाने गोकुळ दूध संघाला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यानंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं गोकुळच्या टँकरलाच लक्ष्य केलेलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

या आंदोलनाची सुरुवात सांगली जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरु हायवेवर येलूर फाटा इथे आंदोलन करण्यात आलं. सकाळी सहाच्या सुमारास दूध टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचा हा टँकर मुंबईकडे निघाला असता, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने हा टँकर अडवला. यानंतर टँकरचे सील तोडून दूध रस्त्यावर सोडलं आणि जोरदार घोषणाबाजी केली.

सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास एकही टँकर सोडणार नाही. सर्व टँकर फोडून अशाच पद्धतीने दूध रस्त्यावर सोडण्यात येईल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version