वॉशिंग्टन,अमेरिका १३ जून २०२३: तापमान वाढल्याने पाण्यात गुदमरून माशांचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील क्विंटाना बीच वर घडली आहे. येथील समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे मृतावस्थेत सापडले आहेत. उन्हाळ्यात अशाप्रकारे मासे मरणे सामान्य आहे, असे तेथील प्रशासनाने मीडियाला सांगितले.
वन्यजीव तज्ञांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात या माशांचा मृत्यू होणे सामान्य आहे. समुद्रातील खोल पाण्यापेक्षा किनाऱ्याजवळचे पाणी अधिक वेगाने गरम होते. अनेक वेळा मासे किनाऱ्याजवळच्या पाण्यात अडकतात. त्यांना परत जाता येत नाही.मासे मरण्यापूर्वी ते पाण्याच्या वर येऊन ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतात, तर काही थंडीसाठी पायथ्याशी जातात. टेक्सासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे किनाऱ्यावर येत आहेत. मृत झालेल्या माशांना हटवून समुद्रकिनारी स्वच्छता करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
टेक्सासमधील वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार कोमट पाण्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळे माशांना श्वास घेणे कठीण होऊन ते मरतात. या प्रक्रियेमुळे मरणारे बहुतेक मासे हे मॅनहेडन प्रजातीचे आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.