Pune ZP Election 2025: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. तब्बल तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर, मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचा गुलाल उधळला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवल्याने, चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात चैतन्य संचारले आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे, या निवडणुकांमध्ये नवा पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, शिवसेना-उद्धव ठाकरे गट) यांच्यात थेट लढत रंगणार आहे. पक्षफुटीमुळे बदललेले राजकीय बलाबल आणि जागावाटपाचे गणित, या निवडणुकांना अधिक रंगत आणणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी इच्छुकांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात, अजित पवार गटाला आपली ताकद सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. तर, शरद पवार गट, काँग्रेस आणि भाजपही आपले वर्चस्व राखण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, आता बदललेल्या परिस्थितीत त्यांना आपली सत्ता टिकवणे सोपे नसेल. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचे गणित आणि बंडखोरी, या निवडणुकांचे निकाल बदलू शकतात.पुणे महानगरपालिकेत काही गावांचा समावेश झाल्यामुळे, जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नव्या रचनेनुसार निवडणुका घेणे प्रशासनासाठी मोठे आव्हान असेल.एकंदरीत, पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असून, ग्रामीण राजकारणात मोठे बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,सोनाली तांबे