Pahalgam terrorist attack experienced by Chinchwad tourists: कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज, उसळलेली एकच धांदल! चिंचवडच्या ५० पर्यटकांनी पहलगामच्या शांत वादीत अनुभवला थरार! ‘मिनी स्वित्झर्लंड’ नजीक घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकवला. मात्र, सुदैवाने सर्व पर्यटक सुरक्षित असून, आता ते चिंचवडकडे परतत आहेत.
शांत पहलगाम अचानक दहशतीने हादरले;
जम्मू-काश्मीरमधील नयनरम्य पहलगाम… शांत आणि सुंदर वातावरणासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण मंगळवारी अचानक दहशतीने हादरले. चिंचवड शहरातील ५० पर्यटकांचा समूह येथे पर्यटनासाठी आला होता. चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांचा समावेश असलेल्या या गटाने १३ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरसाठी प्रस्थान केले होते.
मंगळवारी दुपारच्या सुमारास, हे पर्यटक पहलगामच्या प्रसिद्ध बैसरण घाटी, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते, त्या दिशेने निघाले होते. हॉटेलपासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर असतानाच, अचानक कानठळ्या बसवणारे गोळीबाराचे आवाज सुरू झाले.
या भयावह घटनेचा अनुभव सांगताना चिंचवडचे पर्यटक भाऊसाहेब दरंदले म्हणाले, “दुपारी तीनच्या सुमारास अचानक गोळीबाराचा आवाज आला. सुरुवातीला वाटले की फटाके फुटत असतील. पण, काही क्षणातच जोरदार आवाज येऊ लागले आणि लोकांची एकच धांदल उडाली. आम्हीही जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दिशेने धावलो. नंतर समजले की तो दहशतवादी हल्ला होता आणि त्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले.”
या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलीस पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरुवातीला हल्ल्याच्या तीव्रतेबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याने पर्यटक अधिकच घाबरले होते. दरम्यान, चिंचवडमधील पर्यटकांच्या कुटुंबीयांचे फोन सतत येत असल्याने त्यांच्यात अधिक चिंता निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अमित गोरखे यांनी तातडीने मदत कक्षाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. प्रशासनाशी समन्वय साधून पर्यटकांना चिंचवडला परत पाठवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सध्या हे पर्यटक पहलगाम ते राजोरी मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी तपासणी आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी झाली असल्याने त्यांना झेलम एक्सप्रेस पकडण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी हरप्रकारे मदत केली जात आहे. या घटनेमुळे चिंचवड शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे