राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली उंटवाल्या कुटुंबाची तात्काळ दखल

इंदापूर, दि. ३ जून २०२०: निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील खरात परिवारातील जवळपास ३५ कुटुंबे उंटांचे पालन करुन राज्यभर फिरत शाळकरी मुलांचे ,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमात उंटांवर रपेट मारून आपले जीवन जगत असतात. मात्र सध्या संचारबंदी , लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकळ्या रानावर वास्तव्य करणाऱ्या उंटवाल्या कुटुंबांना इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून जीवनोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.

या जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे तसेच राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी उंट पालन करणारे पवन खरात म्हणाले की, आमच्या उपजीविकेचे साधन खऱ्या अर्थाने उंट असून, आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये आपल्याकडील उंट घेवून जावून त्यातून मिळणा-या उत्पन्नातून आमचे  कुटुंब चालवतो. परंतू मागील तीन महिन्यापासून आम्हाला कोणत्याही भागात जाता येत नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे. सांगली जिल्ह्यातून आम्ही आमच्या मूळ गावी निमगाव येथे आलो आहाेत. मात्र शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला गावाच्या बाहेर विलगीकरण केले आहे. त्यामुळे लहान मुले व आमचे कुटुंब चालवण्यासाठी आम्हाला मोठी आर्थिक अडचण अाली आहे.

या कार्यक्रमावेळी पवन खरात म्हणाले की आम्हाला या जीवनोपयोगी वस्तूंचे व धान्याचे वाटप मोफत केल्यामुळे छोटासा आधार प्राप्त झाला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष निलकंठ मोहिते, उपाध्यक्ष संदीप सुतार, कार्यकारणी सदस्य निखिल कणसे, मार्गदर्शक मधुकर गलांडे तसेच मुख्य सचिव सागर शिंदे उंट व्यवसायिक अजय खंडाळे, भैया खरात, पवन खरात, शनी चव्हाण, सोनू जगताप, दिपक खंडाळे उपस्थित होते.

या कुटुंबांची व्यथा पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी भ्रमणध्वनीवरून सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली . याचवेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना , सदर ठिकाणी धावती भेट देऊन या कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून मदत केली जाईल असा शब्द उंटवाल्या कुटुंबांना दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे