मुंबई, दि. २७ जुलै २०२०: कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, तसेच विविध ठिकाणांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, हॉस्पिटल तसेच इतर अनेक ठिकाणी कामांची पाहणी करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी राजकीय नेते दिवसेंदिवस फिरत आहेत. अशा या महामारीच्या काळात आपल्या कामांची अंमलबजावणी करताना, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांना त्यांच्या आरोग्यात झालेल्या बदलाची जाणीव झाली आणि त्यांनी तातडीने स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे.
आता ते मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल झालेले आहेत. मात्र, ते मागील दिवसांत बऱ्याच ठिकाणांतील बैठकीत उपस्थित होते. या कारणास्तव मागील ४ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून होम क्वारंटाईन व्हावे, आणि आपल्याला काही त्रास होत असल्यास स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून नागरिकांना केलेले आहे.
या सोबतच, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईन, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड