कोल्हापूर, २३ डिसेंबर २०२२: कोल्हापूर-हुबळी आणि कोल्हापूर-सोलापूर या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी मिरजेत नवी कॉर्ड लाईन होणार आहे. याबाबत अंतिम सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. दहा कि.मी. लांबीच्या या नव्या कॉर्ड लाईनमुळे या मार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याखेरीज या मार्गावर नव्या गाड्याही सुरू करता येणार आहे.
मिरज जंक्शनमधून कोल्हापूरसाठी एक, बेळगाव, हुबळीमार्गे पुढे जाणारा एक, तर सोलापूरकडे जाणारा एक असे तीन मार्ग बाजूने, तर सातारा-पुण्याच्या दिशेने एक मार्ग जातो. कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूरकडे जाणाऱ्या; तसेच बेळगाव, हुबळीमार्गे पुढे तिरुपती, हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वे मिरज जंक्शनमधून जातात.
कॉर्ड लाईनमुळे कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूरमार्गे पुढे जाताना; तसेच तिरुपतीकडे जाणाऱ्या गाड्या मिरज जंक्शनवर जाणार नाहीत. या गाड्या कॉर्ड लाईनवर उभारलेल्या स्थानकावर पाच मिनिटे थांबून पुढे मार्गस्थ होतील. या गाड्यांचे इंजिन बदलावे लागणार नाही. कोल्हापुरात लावलेले इंजिनच पुढे अखेरच्या स्थानकापर्यंत कायम राहणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर